Monday, 16 January 2017

नाहीतर एकटं असावं

प्रत्येकाचे प्राथम्यक्रम असतात
याचे विस्मरण होते.  
एकटेपणाच्या गर्तेतून 
बाहेर पडण्याच्या स्वार्थी लालसेपोटी . 

दिशाहीन कुत्र्यासारखे भटकण्याला 
पाखरांच्या स्वातंत्र्याची उपमा 
मीच दिली आहे 
काही न उमजून , आत्मानंदासाठी 

या एकटेपणाच्या खेळात कधी 
मी प्यादं असतो दुसऱ्याचं
 रितेपण भरण्यासाठी 
हे कळत नाही असं नाही 

परंतु भयाण  रितेपण
 सहन होत नाही 
म्हणून फक्त सोबतीची लालसा 
गलितगात्र करते 

एकटेपणाच्या काळाशार डोहात 
हवा असतो एक आश्वस्ततेचा कवडसा 
एक उबदार स्पर्श 
सुप्त जाणिवांवर हलकिशी फुंकर 

कधी वाटत बसू दे उपेक्षेचे 
लाखो डंख 
माझ्या अस्तित्वाची 
जाणीव करून द्यायला 

एकटेपणाचं एक बरं असतं 
नको आमंत्रण , नको उपेक्षा 
नको अपेक्षांची ओझी न पेलणारी
नाहीतरी,  स्वतःच स्वतःला कसं बोचणार 

नेहमीचं कोण साथ देणार 
त्यांच्या परीघात कोण घेणार 
म्हणून कुणी फक्त आपलं असावं 
नाहीतर एकटं असावं . 

No comments:

Post a Comment