"बंधमुक्त "इच्छामरण / दयामरण या संवेनशील विषयाची संकल्पना घेऊन रंगभूमीवर सादर झालं आहे . या विषयाबाबत जगभरात मतभिन्नता आहे . मोजके देश वगळता इच्छामरणाला मान्यता नाही . सर्वोच्च न्यायालयाने आत्महत्या गुन्हा ठरविलेला नसला , तरी इच्छामरणाला अनुकूलता दर्शिविलेली नाही . कारण ,हे या दोन्ही गोष्टी समान वाटत असल्या तरी भिन्न विषय आहेत . इच्छामरण / दयामरण यातली गुंतागुंत जरा वेगळी आहे . उदा . एखाद्या आजाराच्या उपचारात रुग्णाला खूप मानसिक / शारीरिक यातना होतायंत . जगण्याची शक्यता फार कमी आहे . रुग्णांन या त्रासातून मुक्तीसाठी केलेली याचना म्हणजे इच्छामरण म्हणता येईल . डॉक्टरनं या घटनेत नेमकं काय करावं ? इथे त्याच्या व्यावसायिक नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो . त्यानं कर्तव्याला जागावं की , रुग्णाला मानसिक / शारीरिक क्लेशातून मुक्त करावं . वरवर हे इतकं साधं -सोपं वाटत असाल तरी इच्छामरणाचा गैरवापर होणार नाही याची खात्री देता येईल का ? हा अत्यंत गंभीर परंतु महत्वाचा मुद्दा या नाटकानं उपस्थित केला आहे .
एका ऑन -लाईन ओपिनियन कार्यक्रमाच्या चर्चेतून नाटकाचा विषय उलगडत जातो . डॉक्टर आनंद रामराजे , त्याची क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट पत्नी वर्षा रामराजे , तिचा वकील असलेला भाऊ , मानवी हक्क आयोगाचे काम करणारी एक महिला अशी सर्व मान्यवर मंडळी त्या चर्चेत आहेत . डॉक्टर आनंद रामराजे वगळता इतरांचा इच्छामरण /दयामरण याला विरोध आहे . चर्चा सुरु असताना वर्षा रामराजे ब्रिगेडियर मार्तंडराव थोरात यांना आलेला मृत्यू नैसर्गिक नव्हता , घडलेल्या घटना संशयास्पद होत्या असं सूचित करते , तेव्हा संशयाची सुई डॉक्टर आनंद रामराजे यांच्याकडे वळून , नाटक एका वेगळ्या वळणावर जाऊन रहस्य निर्माण करत . ऑन -लाईन चर्चेच रूपांतर रहस्यमय घटनांत होऊ लागत . परिस्थितीजन्य पुरावे डॉक्टर आनंद रामराजे यांच्याकडे अंगुली निर्देश करत असतात .
डॉक्टर वर्षा यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी ज्या तीन गोष्टी उद्युक्त करतात त्या म्हणजे , हेतू , संधी , साध्य . डॉक्टर आनंद रामराजे यांना त्यांच्या हॉस्पिटल साठी काकांची जमीन विकायची असते . परंतु , ती जमीन वडिलोपार्जित असल्यामुळे काका त्यास नकार देत देतात . अशा परिस्थितीत काका ब्रिगेडियर मार्तंडराव थोरात यांच्या मरणानं त्यांचा हेतू साध्य झाला असता . इथं त्यांना काकांच्या इच्छा -मरणाच्या इच्छेमुळे संधीही होती . डॉक्टर आनंद रामराजे यांच्या म्हणण्याप्रमाणे काकांना त्यांच्या आजारामुळे खूप त्रास होत होता व त्यांची जगण्याची श्यक्यता कमी होती . नेमकी इथे प्रेक्षकात मतभिन्नता होते . झालेला मृत्यू इच्छामरण होता म्हणजे बंध की , नैसर्गिक म्हणजे मुक्त .
प्रेक्षक या नाटकाचा अविभाज्य भाग आहेत. प्रेक्षक जो कौल देतील म्हणजे बंध किंवा मुक्त , त्या आधारे नाटकाचे दोन वेगवेगळे शेवट पहायला मिळतील . कौल देणाऱ्या प्रेक्षकांतून तीन भाग्यवान विजेत्यांना बक्षीस तसेच कलाकारांसोबत सेल्फीही काढता येईल .
लहानपणापासून डॉक्टर आनंद रामराजे यांना ओळखत असणारी त्यांची पत्नी त्यांच्यावर संशय घेतेच कसा आणि कौटूंबिक समस्यांची चर्चा अशा कार्यक्रमात करते कशी असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे . ती एक क्रिमिनल सायकॉलॉजिस्टआहे . मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे तिने तपासलेले आहेत .तसेच ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची व स्वतःची ठाम मते असलेली स्वाभिमानी स्त्री आहे , हे पाहता या गोष्टी विश्वासार्ह वाटतात . अशा सर्व मुद्यांचा लेखकाने खोल विचार व अभ्यास केलेला दिसून येतो .
ऑन -लाईन ओपिनियन कार्यक्रमातून कौटुंबिक पार्श्वभूमीत होणारे बदल नेपथ्यकाराने मोठ्या कौश्यल्याने उभे केले आहेत . विषयाचे गांभीर्य , रहस्य राखण्याच्या दृष्टीने केलेली प्रकाशयोजना नेमकी वातावरनिर्मिती करून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. प्रसंगानुरूप केलेली शास्त्रीय संगीताची पेरणी आणि पार्श्वसंगीत नाट्यमय प्रसंगाचे नेमके मूड सांभाळते . विवेक आपटे यांचे लेखन -संवाद प्रवाही असल्यामुळे आणि दिग्दर्शक डॉक्टर बांदिवडेकर यांनी सर्व घटना नैसर्गिकपणे एकमेकात गुंफल्यामुळे , पूर्ण नाटकभर प्रेक्षक संमोहीत होऊन राहतो .
डॉक्टर आनंद रामराजे ही भूमिका तशी आव्हानात्मक आहे. आनंदची हतबलता ,आकांक्षा इत्यादी भावनात्मक पदर डॉक्टर कोल्हे यांनी सूक्ष्मतेने उलगडले आहेत .त्यांची पत्नी वर्षा हिचे, कर्तव्य आणि पती यातले चढ -उताराचे आंदोलन उत्कटपणे साकार झाले आहे . काकांचा इच्छामरणाचा निर्णय , त्यांची अगतिकता , घालमेल अश्या विविध भावनात्मक छटा , शंतनू मोघे यांनी प्रबळ आंतरिक तळमळीतून प्रकट केल्या आहेत इतक्या नैसर्गिक वाटतात . इच्छामरण विषयाच्या तांत्रिक बाजू समजण्यासाठी वकील हे पात्र लेखकाने खुबीने उभे केले आहे . बने यांनी वकिलाची भूमिका सफाईदारपणे पार पडली आहे. लतिका सावंत यांची मानवी हक्क आयोग कार्यकर्तीची भूमिका, या नाट्यात एक वेगळी रंगत आणते . चॅनेल वरील अँकर मध्ये दिसणारा अति-आत्मविश्वास विवेक आपटे यांनी व्यावसायिक अँकर प्रमाणे आपल्या भूमिकेत पुरेपूर उतरविला आहे . सर्वच कलाकारांच्या भूमिका इतक्या सहज झाल्या आहेत आणि नाटक वेगवान असल्यामुळे कुठेही संथपणा न जाणवता , पुढे काय होईल याची उत्सुकता कायम लागून राहते .
असा ज्वलंत विषय ऑन -लाईन चर्चा तसेच फॅमिली मेलोड्रामाच्या माध्यमातून गुंफून इच्छामरणाच्या विषयाला सर्व दृष्टीकोनातून तपासण्याची जबाबदारी या नाटकानं सर्वांवर सोपविली आहे .तुमचा कौल महत्वाचा असल्यामुळे हे नाटक जरूर पहा .
No comments:
Post a Comment