"साखर खाल्लेला माणूस " या नाटकाचा केंद्रबिंदू मधुमेह हा आजार
आहे. कोल्हापूरच्या हौशी रंगभूमीवर लेखक विद्यासागर अध्यापक यांनी हे नाटक आणलं
होतं . त्यांनीच ते दिग्दर्शित केलं होतं . हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर
आलं तर नक्कीच सर्वसामान्य प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया या नाटकाबद्दल" महाराष्ट्र टाइम्स " मध्ये आली होती.आज खरॊखरचं हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलंय अन यशस्वीही
ठरलंय . लेखक वगळता सर्व संच बदलण्यात आला आहे .
मधुमेह साखरेसारख्या गोड पदार्थाशी निगडीत असला तरी तो तितका
गोड नाही. तुमची जीवनशैली पूर्णपणे उद्ध्वस्त करु
शकतो. आज भारतात जवळजवळ 80 लक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. चक्कर
येणे, भूक लागणे, जखम बरी न
होणे ही त्याची सर्वसाधारण लक्षणे आहेत. सुरवातीला
जास्त गंभीर न वाटणारा हा आजार पथ्य न पाळल्यास अक्राळ विक्राळ स्वरुप धारण करु
शकतो. बदलणारी जीवनशैली व ताणतणाव त्याला
कारणीभूत ठरु शकतात. स्वयंशिस्त नसेल तर हा आजार
तुमचे मानसिक शारिरीक शिस्त उध्द्वस्त करु शकेल. आयुष्यभर
स्वच्छंदपणे वागलेल्या विलास देशपांडेला पुढे केवळ मधुमेहामुळे स्वयंशिस्तीचे
महत्व कळते.
विलास देशपांडे हा टारगेटच्या ओझ्याखाली
दबलेला इन्शुरन्स कंपनीचा रिजनल मॅनेजर . त्याची गृहिणी असलेली पत्नी माधवी व एकुलती एक मुलगी ऋचा अश्या छोटयाश्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कहाणी आहे. कंपनीचे लक्ष गाठण्याच्या चढाओढीत विलासचा मानसिक ताण वाढल्यामुळे त्याचा
चिडचिडेपणा परम सीमेला पोहचला आहे. त्याच्या
तणावाला मुलगी ऋचा देखील कारणीभूत आहे. ऋचाच स्वच्छंद वागण त्याला रुचत नाही. मधुमेहाची जी सर्वसाधारण लक्षणे आहेत ती म्हणजे अवेळी भूक लागणे वैगरे
विलासमध्ये दिसू लागतात आणि त्याला मधुमेह झाल्याच निष्पन्न होत. अनेकजण त्याला विविध उपाय सुचवत सल्ले देत असतात या सल्यांनी तो
त्रासून गेलाय. तणावामुळे त्याला असलेली संगीताची
आवड तो विसरुन गेलाय. मधूमेहाने त्याच्या आयुष्यातील सूर बिघडवले आहेत.
वरकरणी तो ऋचाला स्वातंत्र्य देतोय अस
दाखवत असला तरी, वेळोवेळी आपल्या पध्दतीने त्याचे म्हणणे तो
तिच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतो. याची ऋचाला
पूर्ण जाणीव आहे. परंतु तिचे वडिलांवर खूप प्रेम
आहे. याचा प्रयोग तो ऋचाच्या भावी पतीवर देखील
करुन त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु
त्याचा हा प्रयोग ती त्यांच्यावरच कसा उलटवते ही धमाल पाहण्यासारखी आहे.
हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केल आहे. एकूण त्यांच्या दिग्दर्शनाचा बाज लक्षात घेता ते गंभीर वळणाने साकारलेले
असेल असे वाटत होते. नाटकाचा विषय गंभीर असला तरी
ते ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने प्रवाही व खळखळते राहिल, याची
दक्षता घेण्यात आली आहे. नाटकातले संवाद आणि
प्रशांत दामले यांचा उत्स्फूर्त नैसर्गिक अभिनय याच्या
प्रभावाने नाटक बहारदार झाले आहे. ऋचाच स्वच्छंदी
वागण सहज अभिनयातून उत्तरित्या साकार झाले आहे.ओंकारचा भिडस्त स्वभाव संयत अभिनयातून प्रभावीपणे व्यक्त होतो . माधवीचा निष्पापपणा आणि अतिकाळजी शुभांगी
गोखले यांनी नेहमीच्या सहजतेने रंगविली आहे. ओंकारचा
भिडस्त स्वभाव, ऋचाचे स्वच्छंदी वागणे, माधवीची तारांबळ आणि विलासचा परपस्पर विरोधी बेधडक स्वभाव याची जुगलबंदी
बघताना धमाल येते. नाटक कोणताही उपदेश करत नसले तरी हसत
खेळत जीवनशैली, स्वयंशिस्त याचे महत्व अधोरेखित करते. बदलत्या जीवनशैलीमुळे आपण स्वत:शी असलेला संवादच विसरुन जातो व वाढत्या तणावाला आपणच कारणीभूत
ठरतो. विलास गाण्याची जुनी आवड पुन्हा जोपासतो आणि
नाटकाचा शेवट गोड सुरांनी होतो. साखरेसारखे एक
सुंदर गोड नाटक जरूर पहा
No comments:
Post a Comment