Tuesday, 23 May 2017

कोंबडी रस्सा








साहित्य  -

१)   चिकन (बोनलेस २००ग्रॅम वजनाने  )
२)  वाटलेला  गोडा मसाला (१ वाटी  )
३)  कांदा (१ बारीक चिरलेला )
४) टोमॅटो (१ बारीक चिरलेला 
५)  कडीपत्ता (१० पाने )
६) जिरा (१ चमचा )
७) दही (१ वाटी  )
८) आलं -लसूण पेस्ट (२ चमचे )
९)मालवणी मसाला (२ चमचे  ) 
१०) हळद (अर्धा  चमचा )
११)कोथिंबीर (२ वाटी बारीक चिरलेली )
१२)मीठ चवीनुसार 
 १३) एका  छोट्या लिंबूचा रस 
 १४) तेल (३ चमचे ) 
 १५) ४ मिरच्या (उभे छेद देऊन )

कृती -

१)  चिकनला  दही (१ वाटी  ), आलं -लसूण पेस्ट (२ चमचे ), मालवणी मसाला (२ चमचे  ) ,  हळद  अर्धा  चमचा ),कोथिंबीर (२ वाटी बारीक चिरलेली ), मीठ चवीनुसार , एका  छोट्या लिंबूचा रस सर्व   बाजूंनी  लावावे . 

 २) तेलावर जिरा , कडीपत्ता, मिरच्या  २ मिनिटे परतल्यावर , त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. ( साधारण ३   मिनिटे ) टोमॅटो टाकून अजून तीन मिनिटे परतावे . वरील मसाला लावलेले चिकन    त्यात टाकून दहा   मिनिटे झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन शिजवावे 

 ३)वाटलेला गोडा मसाला टाकून ४ मिनिटे परतावे . त्यात दिड   ग्लास पाणी टाकावे .  उकळी येईपर्यंत शिजले की ,  झाकण ठेवून २० मिनिटे मंद आचेवर शिजवावे . वरून कोथिंबीर पेरावी . 




टीप
१)कोकणातील बऱ्याच घरात तळलेला कांदा गोड्या मसाल्यात टाकून वाटण  तयार करतात . हे वाटण   आमटी ,  उसळी, मिसळ  यात वापरता येते . मुंबईच्या पळापळीच्या आयुष्यात लोकांना आयत्यावेळी असे  आवश्यक   वाटण करणे जिकिरीचे असल्यामुळे असे वाटण खूप उपयोगी पडते . 

गोडा मसाला -धणे (2 वाटी ) , जिरा (१ चमचा ), काळीमिरी (१५ ) दालचिनी (४ छोटे तुकडे ),   दगड    फुल (१ चमचा ) , हिंग ( अर्धा चमचा ) ,तीळ (१ चमचा ) मेथी दाणा (१ चमचा ),६ लवंगा ,    सुके  खोबरे (१ वाटी ) ,  लाल मिरच्या (१०)  तेलावर भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करावी . 

गोडा मसाला वाटण -  या   तयार गोड्या मसाल्यात तेलावर परतलेल्या  ४ हिरवी इलायची , २ मोठी    इलायची , २ चमचे आलं -लसूण पेस्ट , 2 हिरव्या मिरच्या ,  कोथिंबीर , कांदा, मीठ  घालून    वाटण  तयार करून  ठेवावे . 

२) दही , टोमॅटो  आवडत नसल्यास वगळावे. मूळ मालवणी पद्धतीत दही , टोमॅटो वापरले जात नाहीत . 

३) आजकाल मिळणाऱ्या मालवणी मसाल्यात सर्वच मसाले वापरले जातात असं नाही . त्यामुळे चवीत फरक पडू शकतो . मला माहित असलेल्या एका पद्धतीत जवळजवळ ३० मसाले वापरले आहेत .  त्यातले काही सहजता उपलब्ध सुद्धा होत नाही .

४)  गोडा मसाल्याऐवजी कांदा , खोबरे , जीरे , शहाजिरे , धने ,मिरी , लवंग ,दालचिनी ,वेलची , लाल मिरची  वापरून वाटण तयार करता येईल . ( जे मालवणी पद्धतीत वापरले जाते )
५) रस्सा चिकन मध्ये हाडासकट चिकन वापरले जाते . मी बोनलेस वापरले आहे



          

          

No comments:

Post a Comment