Monday, 29 May 2017

गाडगे बाबा

                 



           आजवरच्या अनेक साधू -संतांनी देव देवता धर्म व्रते दाने तीर्थयात्रा याचेच प्रचंड बंड माजवून लोकांना देव -खुळे नि धर्मवेडे बनवले . मोक्षाच्या भरंसाट कल्पनांनी कोटिकोटी अडाणी स्त्री पुरुषांना संसारातून उठवून भिकेला लावले . दगड माती धातूंच्या मूर्तीच्या भजन पूजनाचे लोकांना वेड लावून त्यांना. माणसातून उठवले .माणुसकीला पारखे केले . प्रबोधनकारांचे संत , अध्यात्म याबाबद्दल असे रोकडे विचार होते . त्याला कारण नित्यकर्म सोडून अध्यात्माच्या  भ्रामक कल्पनांत गुरफटलेला समाज . आत्मिक , अध्यात्मिक  अनुभूतीची मनाच्या शांती करिता आवश्यकता असली तरी भौतिक जगणे तेवढेच महत्वाचे असते . संत्तांनी भौतिक जगण्याबद्दल एक नीरसता लोकांच्यात निर्माण करून अध्यात्माच्या मायावी कल्पनांत समाजाला गुरफटवून ठेवल्यामुळे समाज व्यावहारिक पातळीवरील माणुसकीला पारखा झाला . गाडगेबाबांवरचे प्रबोधनकारांचे पुस्तक वाचनीय आहे . त्यातून त्यांनी माणसात देव शोधणाऱ्या , खुळ्या धर्मापासून लोकांना सजग करणाऱ्या या महापुरुषाची कथा त्यांच्या रोखठोक शैलीत चितारली आहे .

                    सामान्य लोकांना देव , अध्यात्म याला कुठे थांबवावे . भौतिक पातळीवर जे महत्वाचे नित्यक्रम /कर्तव्ये आहेत त्याकडे किती लक्ष द्यावे द्यावे याबद्दल नेमका भेद त्यांना करता येत नाही .  थोरा मोठ्यांचे अनुकरण करताना हे लोक कसे स्थिरस्थावर झाले , त्यांच्या मुलांचा शिक्षणामुळे कसा फायदा झाला, ते उच्च पदावर का आहेत  याचा विचार  करता येत नसल्यामुळे आध्यत्मिक कर्मकांडात कायम गुरफुटून  राहतात व आपल्या नशिबाला दोष देत बसतात .

            प्रबोधनकारांनी संत आणि अध्यात्म यावर कठोर टीका केली असली तरी गाडगे महाराजांबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती . गाडगे बाबांना  स्वतःला संत म्हणून घेणे आवडत नसे .महान व्यक्तींना संतपण लागले की , जनता त्यांच्या विचाराचे आचरण न करता फक्त पायावर डोके ठेवण्याचे काम करते हे त्यांना ठाऊक होते . त्यांच्या पायावर कुणी डोके ठेवायला आला की , ते त्याला काठीचा फटका देत .  प्रवचन देण्यापेक्षा कृतीतून उदाहरण घालून देण्याकडे त्यांचा कटाक्ष असे . स्वतः निरक्षर असलेल्या गाडगेबाबांचे व्यावहारिक ज्ञान, निरीक्षण शक्ती उच्च कोटीची होती . त्याचा नेमका उपयोग करून कीर्तनातून समाजसेवा, उपदेश  करण्याची त्याची   हातोटी ऊचाशिक्षिताना लाजवील अशी होती .त्यांना कल्पना होती , अध्यात्माच्या कल्पनेतून हा समाज सहजी बाहेर पडणार नाही म्हणून त्यांनी संतांची काही व्यावहारिक पातळीवर ज्ञान देणारी कडवी नेमकी योग्य ठिकाणी पेरून  समाज सुधारण्याचा प्रयत्न केला . माणसं एवढं देव मानतात . देव म्हणजे चांगलं , स्वच्छ, पवित्र , समान असं असतानां ही माणसं प्रत्यक्ष जीवनात वाईट का वागतात , अस्वच्छता का करतात , असमानता -भेदाभेद का बाळगतात याचा  त्यांना प्रश्न पडे . तीर्थयात्रा , अध्यात्म  यातून होणारी भोळ्या लोकांची  होणारी पिळवणूक याबद्दल त्यांना वाईट वाटे . त्याबद्दल कीर्तनातून खडे बोल सुनावत .

                  "दगडाचा देव तो बोलील  कैसा
                   कवन काळी वाचा फुटील त्यासी "

                आपले म्हणणे पटविण्यासाठी ते खूप व्यावहारिक उदाहरण देत . एकदा त्यांनी गावकऱ्यांना प्रश्न केला जगात देव किती ? उत्तर आले , एक . मग त्यांनी गावातील कुलदैवतासकट सर्व देवांची नाव घेतली . मोजले . गावकरी निरुत्तर .माणसातला देव शोधण्यापेक्षा , कशालाही देव करून काम टाळण्याच्या लोकांच्या निष्काम वृत्तीला त्यांचा कडवा विरोध होता .

                अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर तालुक्यातील शेंडेगाव येथे गाडगें बाबा (डेबू ) यांचा जन्म झाला . घराणे सुखवस्तू . गाव अनेक रूढी , दारूचा नवस अश्या चालीरीती जपण्याकरिता खोट्या प्रतिष्ठेत जगणारा ,  सावकारी कर्ज - फास अडकवून घेणारा .यामुळेच डेबूजीच्या घराण्यावर आफत ओढवली होती . गाडगे बाबानी लहानपणापासून सावकारी कर्ज , शिवाशिव , अस्वच्छता , गरिबी या गोष्टी पाहिल्या होत्या . त्यामुळे समाजाला भोगाव्या लागणाऱ्या यातना त्यांनी पहिल्या होत्या . त्याचे विचार यातूनच अगदी स्पष्ट होत गेले . . शिवाशिव , भेदाभेद यावर भाष्य करताना ते व्हराडी बोलीत मासलेवाईक उदाहरण देत . ते म्हणत ,  तांब्याला हात लागला तर इस्त्यान शुद्ध करता . मग ते लोकांना प्रश्न करत " माणूस बाटतो का नाही ? लोक हो म्हणत . मग ते म्हणत , त्याच्या अंगावर गवत टाकून काडी लावणार का ? लोक निरुत्तर होत .

               परटाच्या आयुष्यात बळी तीन . अशी म्हण होती . परीट समाजात जन्म , लग्न,मृत्यूच्या प्रसंगी बोकड , दारू देण्याची प्रथा होती . या प्रथा न पाळल्यास समाजात मोठी बदनामी होई . प्रसंगी लोक कर्ज काढून या प्रथा पाळण्याचा प्रयत्न करत . डेबूजींना मुलगी झाली . त्यांच्या घरात बोकड -दारू देण्याचे बेत ठरू लागले . डेबूजींनी कडाडून विरोध केला . "बारशाला मटण , दारू द्यावी असं कुठल्या धर्मात सांगितलंय ? ते अशी उदाहरण देत की , समोरचा निरुत्तर होई . मारवाडी , गुजराती एवढे श्रीमंत  . त्यांनी या प्रथा पाळल्या नाहीत , त्यांचा काय निर्वंश झाला ? 

            साकार निराकाराचा निरर्थक वाद घालणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या खास शैलीत चांगलेच खडसावले आहे . माणूस देवाचे चित्र काढतो .त्यालाच आपण पाय पडतो . देव सगळ्यांनाच दर्शन देईल . भेदभाव का  करेल .तो कसा आहे आजवर कुणाला उमगले नाही तरी  साक्षात्काराच्या गप्पा कशाला .  सत्यनारायण ,दक्षिणा    यातून पुण्य कमावण्याच्या मागे लागलेल्या जनतेला कर्मयोगाचे अंजन घालून सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत वणवण केली . अंगात देव येणे , नवसाने पोरे होणे याबाबत तुकाराम महाराजांचे दाखले देऊन  भोळ्या जनतेला कायम   अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी प्रकाशाचा  मार्ग दाखविला .

         त्यांचा धर्म खराट्याचा होता . स्वच्छतेचा होता . भौतिक , मानसिक शुद्धतेचा होता . "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन "  फक्त  संत -वचनांचे वाचाळ दाखले न देता प्रत्यक्ष कृतीतून ते विचार प्रत्यक्षात आणत . बाबांनी बांधलेल्या धर्मशाळा हे त्यांच्या तीव्र आंतरिक   तळमळीचे    फळ  आहे . आजचे तथा -कथित संत आणि स्वतःला संत न म्हणविणारा हा कर्मयोगी यांच्यातला भेद पटकन जाणवतो . त्यांना माहित होते दगडाला , देवाला संतपण दिले की , मनुष्य आपले डोके बाजूला ठेवतो . त्याची सारासार विचार करण्याची बुद्धी कुंठित होते. त्यांनी हुंडाबळी , सावकारी पाश , भेदाभेद , व्यसन यावर कठोर टीका केली . स्वच्छतेचे महत्व पटलेला आणि आपल्या  खराट्याने प्रत्यक्षात आणणारा तो एकमेव समाजसुधारक असावा .

             
        मानवसेवा करणे, प्रत्यक्ष कृतीतून दर्शिवणे . वाईट रुढीप्रथांना कडाडून विरोध करणे , विद्येला सर्वाधिक महत्व देणे , गोसेवा याला त्यांनी वाहून घेतले . देवाचे अस्तित्व मान्य करतांना देव माणसात आहे हे वाक्चातुर्याने पटवून देत . केवळ कर्मकांडात गुंतून देव भजणे  त्यांना मान्य नव्हते . त्यांचा देव सेवेत होता . त्यांनी विद्येला सर्वात जास्त महत्व दिले . "ज्याला विद्या नाही त्याला खराट्याचे बैल म्हटले पाहिजे " हे गाडगे बाबांचे खडे बोल लोकांनी गंभीरतेने घेतले तर लोकांना त्यांची पुढील दिशा स्पष्ट होईल . बाबांसारख्या सच्चा समाजसुधारकाऐवजी चमत्कारी  बाबांचे आजकाल पेव फुटले आहे , हे पाहून वाईट वाटते .आज सगळ्यांच्या हातात गंडा, त्यांच्या प्रतिमा  बांधायला उत्सुक स्वयंघोषित गुरु  नाक्यानाक्यावर दिसतात , बाबा म्हणत माझा कुणी शिष्य नाही . मी कुणाचा गुरु नाही . सेवा परमो धर्म हा आमचा  धर्म आहे . 

                        " गोपाळा गोपाळा
                           देवकीनंदन गोपाळा
                           सांभाळी देवा ही तुझी लेकरे
                          पुण्य समजती पापाला ."
       
          

No comments:

Post a Comment