Tuesday, 12 September 2017

माणूस



                         
मला धर्म , जाती  यापलिकडे जगायचे आहे
हे समाजा, मज  मुक्त आभाळी विहारु देशील  का ?
तुझ्या जगण्याचा परीघ तू जग
मला माझ्या परिघात स्वातंत्र्य उपभोगू देशील का ?

तू म्हणशील याला  स्वैराचार करायचा आहे .
नाही . मला संविधानाला जपायचे आहे .
त्यानेच दिलेले मूलभूत स्वातंत्र्य , समता अंगीकारून
खऱ्या अर्थाने  माणूस म्हणून जगायचे आहे .

देवाच्या वारीला निघताना विरघळलेली तुझी जात
परतताना पुन्हा अवतीर्ण होऊ लागते .
मुक्त झालेली गात्र , मोकळं झालेलं मन
पुन्हा तुझ्या प्रभावाने कोमेजू लागते .

हे समाजा मला तुझ्याकडून जास्त काही नको
एक माणूस म्हणून माझी ओळख राहू दे
एक माणूस म्हणून मुक्त वावर करू दे
जगाच्या सु -बदलाचा भागीदार मला होऊ दे .

तू तुला न उकलणाऱ्या नियमांत बांधले आहेस
त्याचे अर्थ उलगडण्याचे हक्कही रांधले  आहेस
मी काय म्हणतो, बदलाची झळ पोहचेपर्यंत
तू तुझ्यात मस्त रहा , मला माझ्यात व्यस्त राहू दे

मला नाही रे बळ छोट्या गोष्टीत वाद घालायचे
देव्हारा कुठे बसवायचा यासाठी तीळ -तीळ शब्द ताणायचे
मला एवढंच माहित तू माणूस , मी माणूस
चांगले जपत राहायचे , माणसांनी माणसांना जोडत जायचे .


No comments:

Post a Comment