१) मी शब्दात गुंतलो होतो
तू केशारंभात गुंतली होतीस
तुला माझी अडचण कळत होती
जाणून तरीही मजा तू घेत होतीस ..
२) पाऊस संकेत देत होता
तुला कधी तो कळलाच नाही
चिंबायचे कितीदा ठरवले पावसात
तू आणि तो परतून बरसलाच नाही
३) किती जीव ओतून
चित्र तुझे चितारले होते
एक कटाक्ष ही न देता
तू पाणी फेरले होतेस
४) सांगायचं बरंच काही मनातलं
उगाचच उगाळत राहून जात
मळभही त्रासून दूर होतं ...
मनातलं मनातच साचून राहतं
५) हृदयातील बेचैन पाखरे
तुझेच गीत गातात ....
येशील अवचित कधीतरी
निलाजरी ती वाट पाहतात
६) मला काही बोलायचं होतं
तिला काही बोलायचं होत
तिच्या डोळ्यातून शब्द ओघळले
अन बरंच काही शब्दांविना उलगडले
७) नयनांचे नयनांशी अविरत
काय सांगणे आहे ...
जे मन इतके सुंदर
त्याचे काय मागणे आहे ...
८) अवकाश आणि सागर
किती जवळ किती दूर
क्षितिजाची पुसटशी रेघ
तेवढीच एक धूसर ....
९) ते घर माझे . ते घर तुझे
घर दोघांचे श्वासात गुंफलेले
सरला प्रकाश ..अव्यक्त अंधार
उरले भाव फक्त ओझरलेले ...
१०) या वाटेवर किती श्वास गुंतले
तू कितीदा स्वप्न रुपेरी विणले
नभाशी अबोल नाते तरीही ...
मृगजळ ते अंधारात विरले .
११) त्या वाटेवर घरकुल माझे गोजिरें
त्या वाटेवर स्वप्न माझे चिमुकले
किलबिलाट तुझा , गुंजारव तुझा
वळ्णावरचे घरटे माझे पाश झाले
१२) एक धुके आसमंतात अवतरलेले
एक धुके सरितेवर , आच्छादलेले
धुक्याने धुक्याची वाट छेदलेले
एक धुके अंतरंगात विरलेले
१३) तुझं दूर असणं जीवघेणं
नको अस्वस्थ हे जगणं
चालेल मज अबोला ...
आश्वस्त करत असणं
१४) किती तरी सांगायचं राहून गेलं
सांगता सांगता हृदयात रुतून गेलं
तुझ्यासवे विहरण्याचे स्वप्न जुनेच
तुझ्याविना कोमेजुन ते गेलं
No comments:
Post a Comment