Thursday, 22 August 2019

विठ्ठल -रखुमाई

         
         


       सकाळची रेल्वेस्टेशनवरची लगबग . बेशिस्तीतल्या शिस्तीनं चालणारी . हजारो माणसं . अगणित विचारचक्र . त्या गर्दीला सवयीने झेलत , माझ्या विचारचक्रांचा  गुंता सोडवत चाललो होतो . विचार कसले ? तर ... या  गर्दीच्या डोक्यात आता नेमके कसले विचार चालले असतील ,  याचे . खरचं ! माणसांना आपल्यापेक्षा इतरांच्या पंचायती फार . मीही त्याला अपवाद कसा  असणार ?

            त्या गर्दीत माझे डोळे ,  नेहमी असणाऱ्या एका म्हातारा- म्हातारीला शोधत होते . नेहमी असायचे . मी यायचो तेव्हा ते दोघे दिसायचे . कपडे नीट नेटके . गौर वर्णाचे , छोट्या चणीचे आजोबा . डोळ्यात हतबलता आणि हातात एक तंबोरा , माथी विठ्ठलाचा टिळा . विटेवर मख्ख उभ्या असलेल्या  विठ्ठलाला साद  घालत  , जगण्यासाठी गाणे आणि त्यांच्या रख्माईने निमूटपणे साद   देणे हा त्यांचा   रेल्वेस्टेशनवरील नित्यक्रम . लोकांना त्यांच्या परिप्रेष्यातून ते जसे दिसत तशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत . कुणी हात जोडे , कुणी दान (भीक ) देई , कुणी उपेक्षेने बोले , कुणी दुर्लक्ष  करे . विठ्ठल -रखुमाईचं ती निमूट  उभी  राहत . 

          मला नेहमी प्रश्न पडे की , या आजोबा -आजींना या वयात इथे का यावे लागते ? त्यांना मुलंबाळं , नातेवाईक नसतील का ? आज जरा लवकर आलो होतो .  नेहमीसारखा हाच विचार मनात चालला होता . इतक्यात ते आजोबा - आजी समोरून येताना दिसले . नेहमी दोघेच दिसायचे  . आज त्यांच्या सोबत एक तरुण -तरुणी दिसत होते . त्यांना चालण्यास मदत करत होते . वा !माणुसकी  जिवंत आहे अजून तर ! माझ्या मनात विचार येतो न येतो तर , कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला  " तो म्हाताऱ्याचा मुलगा आणि ती सून . रोज इथंच भीक मागायला घेऊन येतात त्यांना स्टेशनवर "

कथा

                                                                                                                      




No comments:

Post a Comment