आत्मा हे एक विश्वव्यापी तत्व आहे. ते अविनाशी आहे.पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात या तत्वामुळेच निर्माण होते चैतन्य, आत्मतत्त्व नित्यनूतन असतं. ते स्वयंभू आहे. ते येत नाही अन् जात नाही, केवळ असतं. ते सतत गतिशील असल्याने ही संज्ञा मिळाली आहे. परमात्मा आणि जीवात्मा हे त्याचे दोन पैलू. तत्वज्ञानात त्यास 'आत्मन' म्हणतात. हा इंद्रियगम्य नाही. पापरहित, जरामरणापासून मुक्त, तहानभूक नसलेला शाश्वत आहे. विशुद्ध आत्म्याला अमृतानुभव येतो. शरीराचा व्यापार चालवणारी शक्ती म्हणजे प्राण. त्याच्या आत असतो मनोमय आत्मा. त्याच्या आत विज्ञानमय कोष आणि त्याच्या अंतर्भागात असतो आनंदमय आत्मा. तो तटस्थ असतो. साक्षीभावाने पाहतो. अदृश्य, अचिंत्य आणि अलक्षण असतो. हे आत्मज्ञान म्हणजे मुक्ती.
या आणि अशा उच्च अध्यात्मिक विषयांचा सखोल अभ्यास करणारे डॉ. रमेश नारायण हे सनदी अधिकारी. 73 वर्षाचे तरुण, विशेष म्हणजे त्यांचा लेखन प्रवास वाचनांच्या छंदातून खऱ्या अर्थाने वयाच्या 65 वर्षानंतर सुरु झाला. ज्या वयात माणसं निवृत्ती पत्करतात त्या वयात नवचैतन्याने काम करीत आहेत. वयानुसार एक ठहराव त्यांच्या स्वभावात आला आहे. या ठहरावातून आत्मा या विषयाचे चिंतन झाले आहे. जनसामान्यात मिसळून माणसातली माणुसकी शोधणारी त्यांची गुणवाहक वृत्ती पुस्तका तील बारकाव्यातून सहजपणे प्रतिबिंबीत होते .
संसारात रमताना परब्रह्माचे ठसे त्यांना कुठं ? कसे गवसले ? हे या कथासंग्रहात वाचक समजू शकतात. मानवी आणि अमानवी वृत्तींच्या सीमेवर भेटणारे 'आत्से कसे विचित्र अन् विलक्षण असतात, हा प्रत्यय येतो. या कथांमधली पात्रं प्रत्यक्षात असू शकतात, तशीच काही कल्पनेत भेटू शकतात. मूळ मुद्दा लेखक विसरत नाही, तो म्हणजे प्रत्येकाचा आत्मा आदराने जपणे, काही पात्रे आत्मा हरवलेली माणसे असतात, त्यांचं दर्शनही पुस्तकात सहज होते.
आपपरभाव न बाळगता मोकळेपणाने इतरांचे ऐकून घेणे हा लेखकाचा विशेष मनोभाव. म्हणूनच या कथा जिवंत वाटतात. समोर आलेल्या व्यक्तिरेखेची बारीकसारीक स्वभाववैशिष्ट्ये सापडली, की भूमिकेचा आत्मा गवसतो , असे अभिनेते म्हणतात. लेखकसुद्धा पात्रांच्या अंर्तमनात डोकाऊन सकस लेखन करतो. कथाकार डॉ.रमेश नारायण यांचं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.समर्थ म्हणतात,
'ऐसा जो अनुभव जाला।
तोही नाशिवंतामध्ये आला
अनुभवावेगळा राहिला ।
तो तू आत्मा । आत्माराम :
मनातील निरतिशय शांतीचा जो अनुभव येतो, तो अर्थातच जाणिवेच्या सूक्ष्मतम अस्तित्वामुळेच! हा रसास्वाद ज्यांना घेता येतो तो कलावंत ,असाच प्रत्यय कथा वाचताना पानोपानी येतो .
एकंदर पंधरा कथांचा हा पुष्पगुच्छ विविध रंगांचा आणि रूपांचा आहे. प्रत्येक कथेचा रसास्वाद घेताना प्रस्तावना प्रदीर्घ होण्याची संभाव्य शक्यता आहे. एकूण मांडणी सरस आणि सुरस आहे. 'जत्रा ' कथेतील शाळकरी मुले घरी न सांगता दूर जत्रेला जतात. टूरिंग टॉकिजमध्ये फुकट सिनेमा कसा पाहतात.उशीरा घरी आल्यावर ओरडणारे आणि प्रकृती बरी नसूनही नायकाला शाळेत पाठविणारे बाबा. जत्रेतल्या गमती आहेतच. शेवटी मात्र रखावालदाराचा धक्कादायक प्रसंग कथेची उंची वाढवतो .तर समांतर मध्ये घरासमोर राहायला आलेली ती आणि तिच्या प्रेमात पडलेला तो म्हणजे नायक शाम.
दोघांतील आंतरिक ओढ, निरोपाची केविलवाणी व्याकुळ अवस्था हे प्रसंग लेखकाने अत्यंत तरलपणे टिपले आहेत. तिचं एक गुपित लेखक शेवटी सांगतो. त्यांने या कथेला पूर्ण कलाटणी मिळते. या कथेतून लेखक वाचकांची उत्सुकता शिगेला नेतात.
'हिरमोड' कथेतील सुरेशची गावस्मृती विलक्षण बोलकी आहे. शेती विकल्पावर, घर ठेवल्यावर फार परकेपण जाणवते. गाव 'आपला आहे, या आप्तभावनेने तो जातो अन् आपलेपण हरवल्याचे दिसते. पडक्या घरात राहायचे कसे? काकूकडे गेल्यावर अंतरीची ओल दिसत नाही. महिनाभर राहण्याचा इरादा असतो, पण एका दिवसात गाव सोडावा लागतो. घरचे लोक परत जाताना निराश होतात. लेखकाने संवाद टाळून कयेतील उदासीनताअबोलपणे परिणामकारक साधली आहे.
"बळी कथेची सुरुवातच अशी आहे, की उत्सकतेपोटी वाचक वाचू लागतो. एका नोकरदाराची ही कथा. कार्यालयातील विविध प्रवृतीच्या लोकांच्या मनोवृतीचा लेखाजोखा त्यांनी या कथेत मांडला आहे.कुठल्याही माणसाच्या आयुष्यात असे घडू शकते . लेखकाची संवेदनक्षमता , प्रसंगाचे अचूक अवलोकन, विविध स्वभाव वैशिष्टये, प्रसंग, धक्का तंत्र यांनी पुस्तकाची मांडणी मनोरंजक केली आहे.
सोबत, आत्मा, जगरहाटी, उध्वस्त , झोका आणि आधार या कथासुद्धा लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. सर्व कथांत जाणवणारी विशेष म्हणजे यांत गाव आहे, नागरी जीवन आहे, जीवनांचे अनेक पैलू आहेत. लेखकाची अचूक संवेदनशीलता आणि त्याचे अचूक अवलोकन याने ,लेखक समाजात किती खोलवर रुजलाय याचा अंदाज येतो. या कथेतल्या पात्रांशी तो एकरूप झालाय याची साक्ष पटते . दुसरा मुद्दा असा की, मध्यमवर्गीयांच्या पार्श्वभूमीवर वावरणारी काही पात्रे नात्यातील जाणीवा आणि उणिवा स्पष्ट करतात. संबंधातील मर्यादा अधोरेखित करतात. मानवी जीवनाचा अफाट विसंगत आणि विषय रूपगंधांचे संदर्भ त्यातून मिळतात.
डॉ. रमेश नारायण यांची शैली आशयानुसार बदलते. काही कथांत ते तपशील भरतात. कथा खुलतात. काही कथा हळूवार, नाजूक फुंकर घालतात. सतत प्रतिमांचा उपयोग न करता कथा वाचनीय ठरते. आशयाचे अविभाज् घटक कसे आणि कोणते असतात, हे प्रत्यक्ष वाचल्याशिवाय कळणार नाहीत.
डॉ .रमेश नारायण यांचे कथाविश्व वाचकास माणसांच्या जगण्या-वागण्याचे वेगळेपण दाखवते. ओळखीच्या चौकटीबाहेर जे अगाध जग रंगीबेरंगी लीला करते, ते आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. रमेश नारायण मनापासून करताना दिसतात. कोणत्याही समाजाचे सुसंकृत वस्त्र विणताना संस्काराचे उभे -आडवे धागे एकता ,समता आणि समरसता साधण्याचा प्रयत्न लेखक हा विणकाराच्या भूमिकेतून प्रामाणिकपणे करतो .त्यातून तो आपल्या परिवर्तनशील मनाचे दर्शन घडवतो .अर्थात हा बदल संथपणे होत असल्याने वाचक तटस्थपणे 'जुने ते सोने ' अनुभवतो आणि 'नवे ते हवे ' हेही सांगतो . अनेक गोष्टींचा परस्परसंबंध आणि त्याचा अन्वयार्थ लावणे फार कठीण वाटत नाही .प्रस्तुत 'आत्मा' दृश्यरूपाने आपले रंजन करतो,हेच तर हवंय ना वाचकांना.
अजय भोसले
कवी,अमूर्त चित्रकार,सुलेखनकार, blogger